लातूर: औसा तालुक्यातील वांगजी शिवारात ऊसाच्या फडातून गेलेल्या विद्युत तारा तुटल्याने शोर्ट्सर्किट झाले. यामध्ये दोन शेतकर्यांचा चार एकर ऊस जळाला असून, चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोबतच शेतीपयोगी साहित्य जळाले असून तलाठी व महावितरणच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
वांगजी शिवारात शिवकुमार राजमाने व शाहूराज कावळे यांचे शेत असून, बुधवारी दुपारी विजेची तार तुटल्याने उसाला आग लागली. यामध्ये तोडणीसाठी आलेला चार एकर ऊस जाळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न केले. मात्र, आग आटोक्यात न आल्याने ऊस जळून खाक झाला. दरम्यान तलाठी वर्षा कंजेवाड, महावितरणाचे अभियंता ए. जे. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान, घटना घडलेल्या शिवारातील रोहित्रांची अवस्था बिकट असून लाकडाचा टेकू देऊन विद्युत पुरवठा केला जातो. कीटकॅट नाही, वायर सततच जळणारे, रोहित्रावर 24 तास शोर्ट्सर्किट होऊन आग लागत असल्याने विभागाला तक्रार देऊन, विनंती करूनही वेळेवर दुरूस्ती न झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे शेतकरी शिवकुमार माने यांनी संगितले.


