अहमदनगर: गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आणि जिल्हा बँकेने 40 कोटीचे कर्ज नाकारल्यामुळे राहाता तालुक्यातील श्रीगणेश साखर कारखाना अडचणीत आला होता, परंतु या कारखान्याने गेल्या 66 दिवसांत 1 लाख 6 हजार 650 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 लाख 8 हजार 900 पोती साखरेचे उत्पादन करताना सरासरी साखर उतारा 10.51 टक्के राखला आहे.
श्रीगणेश साखर कारखाना गेल्या 11 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आला असून प्रतिदिन 2 हजार 400 मेट्रिक टन गाळप सुरू आहे. त्यामुळे कारखाना आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक नितिन भोसलेंनी संगितले आहे.
कारखाना अडचणीत आला होता मात्र विवेक कोल्हे यांनी कोल्हे साखर कारखान्यामार्फत श्रीगणेश साखर कारखान्याला ऊस, ऊसतोड कामगार, उपलब्ध करून दिले. आर्थिक, प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर केल्या. शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी, यांच्या मेहनतीने व माजी आमदार बाळासाहेब थोरात या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. हा ऊस उपलब्ध होणे म्हणजे उत्पादक शेतकर्यांच्या कारखान्यावर मोठा विश्वास असल्याचे दर्शवते. तसेच नूतन संचालक मंडळाने थकीत आर्थिक देणी देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. चेअरमन सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते व सर्व संचालक मंडळाच्या परिश्रमाने आणि ऊस उत्पादकांच्या पाठिंब्यामुळे श्रीगणेश साखर कारखाना प्रगतिच्या वाटेवर चालला आहे.