श्रीपूर: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली.
साखर कारखान्यांना साखर मालतारण कर्ज राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एन.सी.डी.सी.) यांच्याकडून उपलब्ध होते. साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल 3,100 रुपये आणि त्यातून 15 टक्के मार्जिन मनी रक्कम वजा करून फक्त 2,635 रुपये प्रतिक्विंटल इतके कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे 3,100 रुपयांऐवजी 3,400 ते 3,500 रुपयांपर्यंत साखर मालतरण कर्जावरील मूल्यांकन दर वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच एन.सी.डी.सी. चे कार्यकारी संचालक बन्सल यांना निवेदन देण्यात आले.
एन.सी.डी.सी. कडून साखर मालतारण कर्जावरील मिळणारा उचलचा दर कमी आहे. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँककडून राज्यातील साखर कारखान्यांना साखर मालतारण कर्जावरील उचलचा दर प्रति क्विंटल 3,400 ते 3,500 रुपयांपर्यंत आहे. साखर कारखान्यांना ऊस बीलाची रक्कम व तोडणी वाहतूक खर्चासाठी लागणारी रक्कम कमी उपलब्ध होत असल्याने मूल्यांकन वाढल्याने साखर कारखान्यांना दिलासा मिळेल, असे परिचारक यांनी पत्रात म्हटले आहे.