ऊसतोडीसाठी ऊसतोड टोळीला पैसे दिल्यास घेणारा व देणारा, दोघांनाही भरावा लागणार दंड

शिरोळ तालुक्यात कुरूंदवाड भागात सध्या ऊसतोडी सुरू झाल्याने ऊसतोड मजूर, वाहनधारक यांच्याकडून ऊस उत्पादन शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे तेथील ग्रामपंचायतीने बैठकीचे आयोजन केले होते. ऊसउत्पादक शेतकरी, कारखान्यांचे फिल्डमन, तोडणी मुकादम, वाहतूकदार यांची मंगळवारी ग्रामपंचायतीसमोर बैठक घेण्यात आली.

या बैठकीत “ऊसतोडीसाठी ऊसतोड टोळीला पैसे दिल्यास घेणारा व देणारा अशा दोघांनाही ५ हजाराचा दंड भरावा लागेल” असा निर्णय शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे झालेल्या शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी अमोल चौघुले होते. त्याचप्रमाणे या बैठकीत ऊस आंदोलन यशस्वी केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे माजी सरपंच सीझाउद्दीन मुल्ला यांनी अभिनंदन केले. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर वाहनधारकांना एंट्री म्हणून द्यायची रक्कम निच्छित केली. तसेच फील्डमननी क्रमपाळी चुकवून ऊसतोड दिल्यास कारवाईचा निर्णय घेतला. वाहन चालकाला ट्रॅक्टर सांगड अडिचशे रुपये, सिंगल ट्रॅक्टर, अंगद व बैलगाडी प्रत्येकी १०० रुपये खुशाली देण्याचे निच्छित केले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब कदम,राजगोंडा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आप्पासाहेब पाटील, संतोषकुमार पाटील, मारुती चौघुले, श्रीपाद पाटील, रामचंद्र निर्मळ, सुनील निर्मळ, संजय पाटील, पोलिस पाटील, सारिका कांबळे आदि उपस्थित होते.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *