अखेर ऊस दराबाबत शासनाने घेतला निर्णय, शेतकरी संघटनेसह कार्यकर्त्यांचा जल्लोष

मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश यांसह विविध  शेतकरी संघटनेच्या वतीने अनेक दिवस आंदोलन सुरू होते. हे आंदोलन मागील हप्ता व चालू हंगामातील ऊस दराबाबत करण्यात आले होते. “ऊस दरवाढ निर्णय झाला नाही तर ऊस तोड देखील होणार नाही”, अशी आंदोलकांनी भूमिका घेतली होती. परंतु आता शासनाने ऊस दर निर्णयावर अखेर तोडगा काढला आहे. गेल्या तेवीस दिवसांपासून ऊस दर प्रश्नावरून साखर कारखानदार आणि शासनविरोधात शेतकरी संघटनेचा लढा सुरू होता, पण शासनाने यावर उपाय काढला असल्याने शिरोळ तालुक्यातील गावागावात शेतकरी साखर पेढे वाटून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त करीत आहेत. प्रशासन यंत्रणा जागी होण्याचे कारण म्हणजे पुणे-बेंगलोर हायवे मार्गावरील शिरोली येथे झालेले ‘चक्काजाम आंदोलन’. ऊस दराबाबत निर्णय घेताना ही प्रशासन यंत्रणा गुरुवारी जागी झाली. ज्या कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या उसाला प्रति टन ३००० रुपये दिले आहेत त्या कारखान्यांनी प्रति टन ५० रुपये आणि ३००० रुपयांपेक्षा कमी किमत दिली आहे त्या कारखान्यांनी प्रति टन १०० रुपये देण्याचा तोडगा निघाला आहे. या निर्णयावर शेतकरी सहमत व आनंदी आहेत. शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शेतकरी संघटनेसह कार्यकर्ते, पाधाधिकारी गावात साखर पेढे वाटून आपला आनंद व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *