“गेल्या हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या”, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी केली आहे. यंदा हंगाम पूर्ण काळ चालणार नसल्याने ऊसाची टंचाई आहे. अशा परिस्थितीत एकदा टोळ्या गेली तर त्या पुन्हा येत नाही आणि त्यामुळे कारखान्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे समिति नेमून तेथे चर्चा घडवूया असा कारखानदारांचा प्रस्ताव फेटाळून संघटनेने आंदोलन केले. आंदोलनाची दखल साखर कारखानदार घेत नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सांगली कोल्हापूर सह राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. सर्व साखर कारखानदार एकवटले आहेत, त्यांनी बोलायचं नाही असं ठरवले आहेत. शेतकरी किती दिवस टिकतात ते पाहत आहेत. त्यांच्यासोबत सरकार आणि विरोधी पक्ष देखील सामील आहेत आणि आम्हा शेतकऱ्यांना एकटं टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आता गावातील शेतकरी देखील एकवटला आहे. पक्ष बाजूला ठेवून एकत्र येत ते गाव सभा घेत आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे ऊस गळीत हंगाम सुरू होताच आंदोलने सुरू झाली आहेत. ऊसाची वाहतूक करणारी वाहने पेटवली जात आहेत तसेच ऊसाने भरलेल्या ट्रोल्या, गाड्या सुद्धा उलटवल्या जात आहेत. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असेच आंदोलन चालू राहणार आहे. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. पण या बैठका देखील निष्फळ ठरल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक तसेच ऊस तोडणी बंद पाडण्यात आली. यामुळे या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे.
जयसिंगपूरला ऊस परिषद घेऊन दाराची मागणी जाहीर करायचची आणि पुढे चर्चेतून मार्ग काढायचा हे या आंदोलनाचे स्वरूप आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे नेत्यांची मात्र कोंडी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन सुद्धा काही उपाय निघाला नाही. या अपयशामागील कारण काय आहे याची चर्चा तर होतच राहील पण ही कोंडी फोडण्यासाठी मात्र आता राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
ऊस दाराच्या या आंदोलनाने नेत्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे आता सर्व नेते मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवत आहेत. या आंदोलनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. ‘राजू शेट्टी स्वतः लढतील आणि आपल्या पक्षाचे उमेदवार उभा करतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे.’ त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा फटका नेमका कोणाला बसणार अशा प्रश्न आहे. महायुतीने लोकसभा प्रतिष्ठेची केल्याने हा गुंता सोडविण्यात सरकारची कसोटी लागणार आहे.
ऊस दर संदर्भात राज्य सरकारने ऊसाच्या उपउत्पादंनांचा हिशेब वेळेत केला नाही, असा आरोप शेट्टी यांनी केलाय. राज्यातील काही कारखान्यांनी फरकाची रक्कम दिली आहे. ते कारखाने जर फरकाची रक्कम देऊ शकतात तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने ती रक्कम का देत नाहीत, असा शेट्टी यांचा कारखानदारांना प्रश्न आहे आणि आंदोलनाचे मुख्य कारण सुद्धा हेच आहे. कारखानदारांचा मात्र राज्यात कुठेच नसलेली ही मागणी रेटून शेट्टी काय साध्य करू इच्छितात असा प्रश्न आहे. कोंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही संघांच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नात लक्ष द्यावे अशी मागणी सुरू केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ, कोंग्रेसचे नेते सतेज पाटील, शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह अधिक नेत्यांनी ही मागणी केली आहे. आता हा प्रश्न राज्य सरकारच्या कोर्टात जाण्याची शक्यता दिसून येत आहे.