सातारा: कराड तालुक्यातील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटिस पाठवल्याचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटिस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे.
याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्याना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सह्याद्रि साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाट अशी नोटिस पाठवली आहे. कारखान्यास ऊस न दिल्यास, कारखान्याचे नुकसान झाल्यास भरपाई म्हणून दंड वसुल करण्यास तुम्ही पात्र आहात, अशी ही नोटिस पाठविण्यात आलेली आहे. याबाबत 15 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे. असे असले तरी 53 वर्षात कारखान्याला सभासद दिसले नाहीत. कारखाना नफ्यात म्हणून कधीही एक रुपयाही बोनस दिला नाही. मागील दोन वर्षांत तर डिस्टिलरी व मशीनरीचे काम सुरू असताना मोजक्या यंत्रणेवर कारखाना सुरू होता. त्यावेळेसही कारखान्याने तुम्ही ऊस कुठे घालता म्हणून शेतकरी आणि सभासदांची विचारपूस केली नाही. आता कारखान्याने सभासदांसाठी चुकीची नोटिस काढली आहे. कारखाने असे न करता नोंद करतील. त्यांचा ऊस वेळेवर न नेल्यास कारखाना जबाबदार राहील. शेतकर्यांचे नुकसान झाल्यास कारखाना भरपाई देईल, अशी नोटिस द्यायला हवी होती.