राज्यात उसगाळप हंगामात 35 लाख टन साखरेचे उत्पादन

पुणे: राज्यात सध्या ऊस गाळप हंगामात 35 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर कारखान्यांनी 402 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले असून सरासरी साखर उतारा 8.84 टक्के आहे.

राज्यात सध्या उसाचे रोजचे गाळप 9 लाख 8 हजार 600 टन याप्रमाणे होत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली आहे. 96 सहकारी आणि 99 खाजगी मिळून 195 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. ऊस गाळपात पुणे विभागाची आघाडी कायम आहे. येथील 29 कारखान्यांनी 92 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले असून 9.09 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 83.68 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे.

गतवर्षीय उसगाळप हंगामात 28 डिसेंबर अखेर 102 सहकारी आणि 99 खाजगी मिळून 201 साखर कारखान्यांनी 478 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले असून 9.32 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 44 लाख 65 हजार टनइतके साखर उत्पादन तयार केले होते. यानुसार 76 लाख टनांनी उसगाळप कमीच झाले आहे. राज्यात कोल्हापूर विभागातील उसगाळप पुणे विभागपेक्षा कमी आहे. या विभागात 84.11 लाख टन उसगाळप पूर्ण झाले आहे. या विभागाचा साखर उतारा 10.09 टक्के जास्त असून 84.88 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. त्याचप्रमाणे सोलापूर विभागात 87.06 लाख टन उसगाळप तर 8.12 टक्के उतार्‍यानुसार 70.71 लाख टन क्विंटल उत्पादन झाले. अहमदनगरमध्ये 51.66 लाख टन, औरंगाबादमध्ये 38.02, नांदेड 45.59, अमरावती 3.48 व नागपूरमध्ये 0.83 लाख टन इतके उसगाळप पूर्ण झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *