सोलापूर: जानेवारी महिना संपला तरीही जिल्ह्यातील साखर उतार्यात फारशी वाढ न झाल्याने यंदाच्या हंगामात सिद्धेश्वर कारखान्याला 25 कोटींचा तोटा सहन करावा लागणार असल्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी संगितले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याचा प्राथमिक अंदाज होता. सोलापूर विभागातील अनेक कारखान्यांना गळीत हंगाम अडचणीचा वाटत होता. प्रत्यक्षात हंगाम सुरू झाल्यानंतर कारखानदारांचा अंदाज चुकीचा ठरला. अपुर्या पावसामुळे ऊसाची पुरेशी वाढ झाली नाही. त्याचा यंदाच्या गळीत हंगामाला चांगला फटका बसत आहे. मागील वर्षी जानेवारी अखेर साखर उतारा 10 पर्यन्त होता. यंदा त्यात मोठी घट झाली आहे. उसातील साखरेचे प्रमाण एक टक्क्यांनी घटले आहे. सिद्धेश्वरने यंदा उसाला सर्वाधिक दर जाहीर केला असून फेब्रुवारी अखेर ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांना 3200 रुपये प्रति टन द्यावे लागणार आहे. याचे गणित कसे घालायचे असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे.
सिद्धेश्वर कारखान्याला यंदा घटत्या साखर उतार्याचा फटका सहन करावा लागणार आहे. जानेवारी अखेर 9 टक्के साखर असल्याने कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे.
सोलापूर विभागातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात को-265 वाणाचा ऊस मोठ्या प्रमाणात आहे. या वाणाला परिपक्वता येण्यासाठी किमान 14 ते 16 महिन्यांचा कालावधी लागतो मात्र शेतकर्यांना गाळपाला ऊस पाठवण्याची घाई असते. परिपक्व ऊस मिळत नसल्याने कारखान्यांचा ही नाईलाज होतो त्याचा साखर उतार्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
“कारखान्याने हंगामासाठी उस दर जाहीर केला आहे. त्यावेळी परिस्थितिची कल्पना नव्हती, मात्र आता माघार घेता येणार नाही. उस दरात बदल करणे आवश्यक अयोग्य ठरेल. उतारा कमी झाल्याने 25 कोटी रूपयांचा तोटा सहन करावाच लागेल.” – धर्मराज काडादी, ज्येष्ठ संचालक, श्री सिद्धेश्वर कारखाना