ऊस तोडणार्‍या मजुरीच्या दरवाढीचा निर्णय, दर तीन वर्षानी होणारा करार पुन्हा करणार

बीड: बुधवार दि. 27 रोजी मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट मध्ये ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत ऊसतोड मजुरांच्या दराबाबत जो करार दर तीन वर्षानी होतो, तसाच करार करण्याचा निर्णय झाला.

ऊसतोड मजुरांची मजूर दरवाढ आणि त्यांनी दिलेल्या संपाच्या इशार्‍यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ऊसतोड मजूर कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार आहे. कामगारांच्या मजुरीत 29 टक्के दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे. परंतु ही दरवाढ 40 टक्के असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम असल्यामुळे त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने घ्यावा असे साखर संघ व ऊसतोड मजुर संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे एकमत आहे. त्यामुळे येत्या 5 जानेवारीपर्यंत पवार-मुंडे लवादीची बैठक होणार असून यात ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

ऊस तोडणार्‍या मजुरांच्या दरबाबत जो करार दर तीन वर्षानी होतो तो साखर संघ, ऊसतोड मजुरांची संघटना व सरकार असा त्रिस्तरीय होत असतो. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व शरद पवार यांच्या काळापासून या करारासाठी आदरपूर्वक निर्णय घेतला जात होता. असा निर्णय पुन्हा घेण्यासाठी 5 जानेवारी दरम्यान पुन्हा बैठक घेऊन शरद पवार, पंकजा मुंडे व ऊसतोड कामगारांच्या संघटनेचे एकूण सोळा प्रतीनिधी यांच्या उपस्थितीमध्ये असाच करार पुन्हा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. करारासाठी कोणताही लवाद नेमलेला नसून परंपरेप्रमाणे संघटना, साखरसंघ व सरकार असा तो करार केला जाणार आहे. याप्रसंगी साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, प्रकाश आवाडे, ज्येष्ठ संचालक जयप्रकाश दंडेगावकर आणि ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने आ. सुरेश धस, गोरक्ष रसाळ, श्रीमंत जायभाये आदि उपस्थित होते.   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *