कोल्हापूर: गवसे येथील आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पाचव्या वार्षिक निवडणुकीत पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीप्रणीत रवळनाथ विकास आघाडीने बाजी मारली. पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी गोपाल मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. संचालकपदाच्या 21 जागांपैकी 19 जागा जिंकून विजय मिळवला. मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या जोडण्या तसेच उमेदवारांची अचूक निवड आणि विरोधकांच्या प्रचारासाठी त्यांच्याच नेत्यांनी दिलेला नकार या गोष्टींच्या जोरावर राष्ट्रवादीच्या आघाडीने दणदणीत विजय मिळवला. विरोधी आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे गटाला फक्त 1 जागा मिळाली आणि 1 जागा बिनविरोध निवडून आली. सतेज पाटील आणि विनय कोरे यांनी राष्ट्रवादीविरोधात सातत्याने बैठका घेतल्या असल्यातरी मुश्रीफ यांनी त्यांच्या आघाडीवर मात केली. निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
राष्ट्रवादीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मुश्रीफ, पाटील व कोरे यांच्या बैठकांतून जास्त जागा मिळत नसल्याचे दिसून येत होते त्यामुळे राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला होता परंतु कार्यकर्त्यांच्या दबावामुळे मुश्रीफ यांचे मन बदलून त्यांनी निर्णय बदलला. ‘अशोक चराटी’ अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे कारभार सांभाळला ते राष्ट्रवादीने लक्ष ठेवले. सुरूवातीला ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते पण निकालात राष्ट्रवादीने चांगलीच बाजी मारली. मुश्रीफ यांनी आघाडी करण्याचे ठरल्यानंतर सूत्रे आपल्याकडे घेतली. मुकुंद देसाई निवडणुकीसाठी तयार नव्हते त्यांना तयार केले.
या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह नऊ संचलकाना पराभवाचा धक्का बसला. कारखाना निवडणूक विद्यमान अध्यक्ष पराभूत होण्याची ही तिसरी वेळ आहे. ‘ब’ वर्गातील फेरमतमोजणीत अशोक तरडेकर विजयी झाले तर नामदेव नार्वेकर यांचा 14 मतांनी पराभव झाला. सभासदांनी विद्यमान 6, माजी 2 संचालकांसह 13 नवीन चेहर्यांना संधी दिली. रणजीत देसाई, दीपक देसाई, शिवाजी नंदवडेकर, गोविंद पाटील, राजेश जोशीलकर, राजेंद्र मुरकुटे, संभाजी पाटील, संभाजी रामचंद्र पाटील, रचना होलम, मनीषा देसाई, काशीनाथ तेली हे संधी प्राप्त झालेले नवीन चेहरे आहेत, तर विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, माजी अध्यक्ष अशोक चराटी, गोकुळच्या संचालिका श्री. अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर, संचालक दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, मल्लिककुमार बुरूड इत्यादी प्रमुख पराभूत उमेदवार आहेत.
त्याचप्रमाणे आजरा कारखाना विजयी उमेदवार व त्यांची मते पुढीलप्रमाणे:
रवळनाथ विकास आघाडी- उत्पादक गट- मारुती घोरपडे( 8562 उत्तूर), दीपक देसाई(8498 मडिलगे), वसंतराव धुरे(8753 उत्तूर); आजरा- शृंगारवाडी गट- मुकुंद देसाई(6869 आजरा), शिवाजी नांदवडेकर(8040 वाटंगी), सुभाष देसाई(8231 सिरसंगी); पेरणोली- गवसे गट- उदयराज पवार(8555 पेरणोली), रणजीत देसाई(8693 सुलगाव), गोविंद पाटील(8351 घाटकरवाडी); भादवण- गजरगाव गट- मधुकर देसाई(8800 सरोळी), राजेश जोशीलकर(8760 भादवण), राजेंद्र मुरकुटे(8199 कानोली); हत्तीवडे- मालीग्रे गट- विष्णुपंत केसकर(8926 किणे), अनिल फडके(8524 सुळे), संभाजी पाटील(8788 हत्तीवडे); महिला प्रतीनिधी गट- रचना होलम(9870 पोळगाव), मनीषा देसाई(10246 वेळवट्टी); अनुसूचीत जाती जमाती- हरिभाऊ कांबळे(10356 पेरणोली); इतर मागासवर्ग प्रतीनिधी- काशीनाथ तेली(9823 होण्याळी).
मतदारांनी मतदानातून पालक मंत्री मुश्रीफ यांच्यासाठी बोलके संदेश दिले की, पाच वर्षात 50% कारखाना कर्जमुक्त करा, तसेच कामगारांना 5% वेतनवाढ द्या. सभासदांना सवलतीची साखर द्या. वसंत धुरे यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची वाटणी करा. तसेच सुनील शित्रे यांनी कारखाना चालवण्यासाठी व आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी राष्ट्रवादीला दिलेला कौल मान्य केला. त्याचप्रमाणे झालेल्या काही चुकांबद्दल आत्मचिंतन करू असे देखील त्यांनी संगितले.
येत्या पाच वर्षात मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली इथेनॉल व को-जनरेशन प्रकल्प राबवून कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असा दावा आघाडीचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी केला.