सांगली: जिल्ह्यातील कारखानदारांची सोमवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेण्यात आली होती. दिवसभरात ऊस दराच्या दोन बैठका अयशस्वी ठरल्यानंतर अखेर रात्री उशिरा ऊस दराचा तोडगा निघाला. ‘दत्त इंडिया’ साखर कारखान्याने एफआरपी आणि 100 रुपये देण्याचे मान्य करून ऊस दराची कोंडी फोडली. त्याचप्रमाणे दत्त इंडियाच्या मान्यतेनंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्त्यांनी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दत्त इंडिया कारखान्यात 36 तासापासून सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतले.
वसंतदादा साखर कारखाना भाड्यानी चालवत असलेल्या दत्त इंडिया कंपनीने दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी संघटनेने रविवारी(10 डिसेंबर) आक्रमक भूमिका घेतली होती. कारखान्याचे गेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली होती. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. राजू शेट्टी यांनी जिल्हा प्रश्नसोबतच बैठक घेण्याचा आग्रह केला. वासंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांशी ऊस दर कोंडी फोडण्याबाबत चर्चा केली परंतु ही चर्चा देखील असफल ठरली. त्यामुळेच स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर कारखाना प्रशासनाने जिल्हाधिकारींशी संपर्क साधून दुपारी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेण्याचा निर्णय घेतला. प्रशासन, साखर कारखानदार व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात काल सायंकाळी बैठक झाली, परंतु ती बैठक निष्फळ ठरल्याने राजू शेट्टी संतप्त होते.
दत्त इंडिया कारखाना आणि स्वाभिमानी मध्ये रात्री उशिरा पुन्हा बैठक झाली. दत्त इंडिया कारखान्याच्या उपध्यक्षांनी एफआरपी 3041 रुपये आणि 100 रुपये जास्त असा प्रति टन देण्याचे मान्य केले आणि ऊस दराची कोंडी फोडली. तसे पत्र मिळताच राजू शेट्टी यांनी आपले आंदोलन मागे घेऊन, स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या पत्रात, आपली मागणी सदर संस्थेने मान्य केळ्याचे लेखी कळविले असल्याने आपण आपले संघटनेमार्फत सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे नमूद केले होते.